Sunday 18 September 2016

संपले सारे

संपले सारे

माझ्या सासूबाई  ..वय वर्ष ७८ ..गेली अनेक वर्षे डिमेन्शिया ने ग्रस्त .

आजाराची  सुरवात कधी कशी झाली हे कळलेच नाही .

स्वयंपाक , घरची काम , नवऱ्याला काही हवे नव्हे सगळे करायच्या . वजन ही बऱ्यापैकी होते . आमचे लग्न ठरले तेव्हा त्यांच्या अंगात यायचं ,त्या दोन्ही हातातून हळद ,कुंकू काढायच्या असे कानावर पडले होते ,पण अशा गोष्टींवर  माझा विश्वास नसल्यामुळे मी त्यात जास्त लक्ष घातले नाही .देवावर प्रचंड श्रद्धा .

नवरा म्हणजे सर्वस्व ..प्रति देवच .

२० एक वर्षापूर्वी हृद्ययाचा प्रॉब्लेम सुरु झाला ..हार्ट एन्लार्जमेन्ट ...डॉक्टरनी कडक पथ्ये सांगितली ,ती कायम तंतोतंत पाळल्यामुळे प्रकृती हळुह्ळु सुधारली .

ह्या बाईने त्या वेळीस मीठ जे सोडले ते कायमचे अगदी शेवट पर्यंत .

नंतर दोघांची वय वाढल्या  मुळे त्यांना एकट ठेवण आम्हाला प्रशस्त वाटेना ,त्यामुळे त्यांना आमच्या घरी आणून ठेवले .पथ्य पाणी , स्वतंत्र खोली , टीव्ही त्यामुळे त्यांचा वेळही मजेत जात होता . वर्षा खूप करायची .

सहा महिन्यांनी थोडा बदल म्हणून त्यांना त्यांच्या मोठ्या मुलीकडे पाठवले .मग अनेक वर्ष तसाच पायंडा पडला .सहा महिने इकडे सहा महिने तिकडे ..

आणि एके दिवशी वर्षाचे वडील अचानक गेले .

अचानक बसलेल्या धक्क्यातून सासू कोलमडली .  इतक्या वर्षांचा सहवास तटकन तुटला . इतकी वर्षे नवऱ्याचे थोडेफार बॉसिंग होते ,आणि जे तिला आवडत होते ,ते संपले .एक पोकळी निर्माण झाली आणि तिथूनच डोक्यातले घड्याळ बहुतेक बिघडले . ..पहिल्यांदा छोट्या छोट्या गोष्टींचे विस्मरण , नंतर काही वर्षात पाटी कोरी ....

प्रश्न विचारले की एकटक बघत बसणे ,मग आपण आठवण करून दिली की थोडेफार आठवायचे ..पण तेव्हड्या पुरतेच .

दोन एक वर्षा पासून आजार जास्तच बळावला.मी कोण असे विचारले तर " डॉक्टर ""बाबा" असे काहीही बोलायच्या .पण आश्चर्य म्हणजे त्यांना खुप आधीचे म्हणजे  त्यांच्या लग्ना आधीचे आठवायचे ..तुमचे नांव काय असे विचारल्यावर आपले माहेरचे नांव सांगायच्या .

दिवस जात होते आणि त्या अचानक सिरीयस झाल्या . सर्दीचे निमित्त होऊन  त्यातून त्याना निमोनिया झाला. दोन्ही फुफ्फुस पाण्याने भरली. पौड रस्तावरील एका रुग्णालयात त्यांना भरती केले.

डॉक्टरांनी तपासून निमोनिया झाला असून दोन्ही फुफ्फुस पाण्याने भरली असल्याचे सांगितले ,तसेच अशक्तपणा खूप आहे आणि बी पी अगदी वाईट आहे आणि त्यांची स्थिती अतिशय क्रिटीकल असल्याचे सांगितले.

त्यांना आम्ही icu मध्ये ऍडमिट केले  कुठल्याही life support  सिस्टिम चा वापर करायचा नाही हे आम्ही सर्वांनी विचारांती आधीच ठरवून टाकले होते .

काहीच उपयॊग होणार नसेल तर  लेट नेचर टेक इट्स ओन कोर्स , वी विल मेक अँड हेल्प  हर पास अवे पिसफुली असे मी त्या डॉक्टरना सांगितले .त्यांनी त्यास मान्यता दिली व एक दिवस आय सी यु मध्ये ठेऊन दुसऱ्या दिवशी काय ते बघून ठरवू असा सल्ला दिला .आम्ही त्यास होकार दिला .

 फुफ्फुसातील पाणी काढण्याचे प्रयन्त सुरु झाले .पण अतिशय अशक्तपणा ,चांगले नसलेले हृदय ह्यामुळे त्यांना  ते झेपेनासे झाले व ते प्रोसिड्यूर थांबवावे लागले . त्या मधल्या वेळात औषधे चालूच होती .

आता रात्री तेथे थांबून काहीच फायदा नसल्याने आम्ही सगळे जण घरी गेलो.

मी सकाळी परत गेलो असता त्याच्या वर उपचार करणारे डॉक्टर भेटले . मी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी नो होप्स  ..जास्तीत जास्त २४ तास असे सांगितले .

आता आम्हाला पूर्ण कल्पना आली .

मी तेथेच बसून राहिलो.अधून मधून आत जायच ,त्यांना  बघायचे ,मागील भिंतीवर लावलेल्या मॉनिटर वरच्या आकडयांचे " खेळ"बघायचे व परत बाहेर येऊन बसायच अस चक्र सुरु झाले .

मॉनिटर वरच्या आकडे १२९ ते १२० व ८८/८०/७८ असे आकडे दर्शवत होते . त्यावरून वरच्या ओळीतले म्हणजे हार्ट बिटस ,खालचे म्हणजे बी पी आणि त्या खाली किति श्वास ओढला जातोय ते दर्शवित होते . 

ते आकडे कधी कमी कधी जास्त होत होते घेतलेल्या प्रत्येक श्वासा बरोबर ते बदलत होते जसे ते बदलायचे तसे माझे विचार ही बदलायचे .,हार्ट बिट्स वाढले की , अरे आता थोडा सुधार दिसतो असे वाटायचे तेव्हड्यात ते खाली घसरले की धस्स व्हायच .आशा निराशेचा खेळ चालू होता .

वेळ जात होता ..

मधेच मी त्यांच्या  बघायचो . एकेकाळची सुधृढ बाई आता हाडाचा सापळा होऊन पडली होती . नाकात ऑक्सिजन ची नळी ,गळयात कट घेऊन घातलेली ट्यूब ,त्यातून जाणारे औषध ,गळ्यापर्यंत ओढून घेतलेली चादर आणि एक वेगळीच नजर .. डोळे बहुतांशी वेळा बंद होते पण मधेच त्या  ते उघडून बघायच्या , बघायच्या पण मान तिरकी करून . त्यांच्या बेड च्या मागेच खिडकी होती .ती जरी बंद होती तरी त्यातुन प्रकाश आत येत होताच . त्यांची भकास नजर त्या प्रकाशा कडे वळायची .थोडा वेळ झाला की मान सरळ करुन ,आपण नकारार्थी हलवतो तशी हलवून परत डोळे बंद करून घ्यायच्या . ते दृश्य वारंवार बघून माझ्या डोक्यात वादळ उठले . काय होतय त्यांना ? तिकडे काय बघत आहेत सारख्यया आणि मानेने नाही नाही काय म्हणताहेत  आणि कोणाला ? 

त्यांना  पैलतीर तर दिसू लागला नसेल ना ? तिकडून कोणी बोलवत तर नसेल ना आणि जीवनाची आसक्ती त्यांना  हा काठ सोडून तिकडे जायला आडकाठी तर करत नसेल ना ? काय चालले असेल आत्ता त्यांच्या मनात ? 

ज्या मनात इतक्या वर्षात काहीच खळबळ उडाली नाही , स्मृतीचे कुठलेच तरंग उठले नाहीत त्यात आता एकदम कसे बदल झाले ? दिवा विझण्या आधी मोठा होतो तसे तर नाही ना ? का तसे काहीच नाहीये , थकलेल्या स्नायुंची रिफ्लेक्स action होते आहे ?काहीच बोध होईना...दोन तीन तास असेच गेले..

संध्याकाळ झाली आणि आकडे झपाट्याने बदलू लागले .इतका वेळ आशा जागवणारे आता अशुभाची सूचना देऊ लागले होते .

७८-७० / ६० - ५०/ २०-१० / ५---- बीप ...बीप..., बीssssप..

 संपले सारे..

मी मॉनिटर वरची नजर काढून त्यांच्या  कडे बघितले  तर त्या  शान्त पणे झोपल्या सारख्या वाटत  होत्या .काल पासून ...नाही खरं तर १५-२० वर्षे चाललेली तडफड थांबली होती ..स्मृती विस्मृती चा तो जीवघेणा पाठलाग थांबला होता ..

सुनील

०७.०९.२०१६

No comments:

Post a Comment