Friday 18 November 2016

ढाबळ

ढाबळ

परवा वाईला जाताना , खेड शिवापूर च्या पुढील एका प्रसिद्ध वडा पाव स्टॉल पाशी थांबलो होतो ...प्रचंड गर्दी असल्याने वडा गाडीतच बसून खात होतो .अचानक एक गलका , उच्च टिपेतल्या हाका व शिट्ट्या कानावर पडल्या .

त्या  कशाच्या आहेत हे माझ्या लगेच लक्षात आले व मी गाडीतून खाली उतरून नजर वर आकाशाकडे केली ..माझा अंदाज खरा ठरला .

दूरवरून उडत येणारा एक मोठा थवा नजरेस पडला. अतिशय वेगाने तो आम्ही उभे होतो त्या इमारतीकडे येऊ लागला . त्या थव्यात पांढरी ,कागदी व नेहमीची राखाडी कबुतरे होती .
हाका व शिट्ट्यचा जोर वाढला . तो थवा तेथे न थांबताच एक झोकदार वळण घेऊन परत दूर गेला .म्हणजे त्या गच्चीत कोणीतरी कबुतरे पाळली असणार व आता तो त्यांना दिवसाची कसरत देत असणार हे लक्षात आले  व माझे मन त्या थव्या च्या वेगा पेक्षाही वेगाने चाळीस बेचाळीस वर्षे मागे गेले .

त्यावेळी मी आठवी नववीत होतो . आम्ही कमला नेहरु पार्क समोरील एका इमारतीत रहायचो .शाळा ही जवळ .मित्र परिवार हा ही जवळच रहाणारा ,प्रभात रोड  भागातला ..या मित्रां मधील बहुतेक सारे तळागाळातील कुटुंबा तील होते .त्यांचे आईवडील माळी काम ,साफसफाई ,भांडी कपडे धुणे अशी कामे करत असत ..ह्या मित्रांकडून  बरेच काही शिकायला मिळाले .झाडां वरील आंबे ,मालकाची नजर चुकवून कसे काढयायचे , टेकडीवर कसे हिंडयायचंए ,पक्षी ,सरडे  गिलवरीने कसे उडवायचे , झाडे कशी ओळखायची ..असे आता विचार करता अवलक्षणी ,विदूळ वाटी बरेच काही शिकलो .
ह्याच मित्रांपैकी एकाला कबुतर  कशी पाळायची ह्या बद्दल माहिती होती .आमच्या सोसायटीला मोठी गच्ची होती . तेथे आपण कबूतर पाळू ,खूप मजा येते असे सांगून त्यांने मला तयार केले.

आम्ही लगेच कामाला लागलो . कबुतर ठेवतात त्या जागेला ढाबळ म्हणतात .एक छोटे खोके ते लाकडात बनवून घेतलेली अनेक घर असे आपापल्या वकुब व खिशातील पैसे ह्यावर त्याचा आकार ठरतो ..आम्ही एक जुने लाकडी खोक आणून त्याची ढाबळ बनविली .त्यात पाण्या साठी एक व अन्न ठेवण्यासाठी अशी दोन प्लस्टिक ची भांडी ठेवली .
पुढे मागे त्यांनी अंडी घेतली ,त्यांना पिल्ल झाली की काय करायचे म्हणून दोन छोट्या लाकडी पेटया ठेवल्या. सर्व तयारी झाली ..आता फक्त स्टार कास्ट म्हणजे कबुतरे येण बँक होते .एका रविवारी आम्ही दोघे बालगंधर्व च्या शेजारी भरणाऱ्या कबुतरांच्या बाजारात गेलो .तेथे अनेक जण कबुतर विकायला बसले होते . हे नको ते नको असे करत करत आम्ही सहा कबुतर घेतली .

घरी आणल्या नंतर त्यांना ढाबळीत ठेवले व वर एक पातळ फडके टाकले .

त्या नंतर दररोज उठल्या बरोबर मी वर जाऊन त्यांना खाणे पिणे देत असे .त्या मित्राच्या  शिकवणीचा उपयॊग होऊन काहि दिवसात च मी त्या कलेत तयार झालो . 

कबुतर उडवून ती परत आपल्याच ढाबळी त परत आणणे ही एक कलाच . त्यात त्यांना व्यायाम हा होतोच पण आपण इतरांची कबुतरे भुलवून आपल्याकडे आणू शकतो . 

सर्व कबुतर एकदम उडवायची नाहीत , काहीचे पंख छाटून ( काही ठराविक पिसे काढली की त्यांना काही दिवस उडता येत नाही)

ती उडून वर गेली की लगेच परत येऊ नयेत म्हणून आरोळ्या ,शिट्या , हातातील फडके उंच उडवणे अशा अनेक करामती करायला लागतात ,त्याही मी शिकलो . आमच्या सोसायटीच्या परिसरात आता रोजच हा कल्ला सुरु झाला .त्याने व कबुतरांच्या विष्ठा व वासाने आजूबाजूची सुशिक्षित ,पांढरपेशी लोक बिथरायला वेळ नाही लागला .त्यातील काहींनी बाबांकडे तक्रार केली ..बाबांना हे सर्व कळल्यावर ते प्रचंड खवळले .त्यांनी मला समोर उभे करून ह्या गोष्टी कशा वाईट आहेत, ह्याने कोणाचेही भले होत नाही , मारामाऱ्या होतात व तुला हे भिकेचे डोहाळे का व कसे लागले ह्याची चौकशी करून माझे  बॊद्धीक घेतले. हे सर्व चालू असताना तो माझा मित्र गुरु तिथून जो गुल्ल झाला तो पुन्हा केव्हाच परतला नाही . ताबडतोब हे धंदे बंद झाले पाहिजेत असा सज्जड दम मला लाभला .

ती ढाबळ,ती कबुतरे, त्यातील पिल्ल , ती भांडी सर्व गेले .गच्चीतला तो कोपरा मोकळा झाला ..कायमचा ..

आता मागे वळून पहाता असे जाणवते की मी व बाबा दोघेही आपल्याला भूमिकेतुन त्या कडे बघत होतो .दोघेही आपापल्या परीने बरोबर होते .त्यांना माझ्यावर होणारे संस्कार ,माझे भवितव्य , माझे शिक्षण हे दिसत असणार ,त्यांना त्याची काळजी असणार व मला त्या छंदा तले थ्रील ,त्यातील मजा हे आकृष्ट करत होते .

पण तो छंद तेथेच थांबला ..

परवा तो कप्पा अचानक उघडला ..तो आठवणींचा कोपरा अचानक उजळून निघाला ...

सुनील

१८.११.२०१६

No comments:

Post a Comment