Saturday 19 November 2016

धमाल

धमाल 

शाळेत असताना सुट्टीत करायचे हे ठरलेले नसायचे .मनात येईल तसे करायचे , मनाला वाटेल तसे आणि तिकडे भटकायचं .कधी पर्वती , कधी लॉ कॉलेज टेकडी  ,वेताळ टेकडी कधी सिंहगड तर कधी मुळशी .

कधी दोन पायाने ,कधी सायकल ने तर कधी एस टी ने .

अशीच एकदा सणक आली आणि आम्ही तीन मित्र निघालो .पहाटे उठून कर्वे रोड ला एस टी पकडली . स्थानापन्न झाल्यावर आजूबाजूला बघितले तर शहरी फक्त आम्हीच .बाकी सर्व गावकरी , शेतकरी आणि गवळी .प्रत्येका जवळ एकादी पिशवी ,  काठी ,दुधाची कासंडी त्यांचे कपडे ही बरेचसे सारखेच . लांब पांढरा  शर्ट , पांढरा लेंगा किंवा धोतर , खांद्यावर एखादे फडके किंवा धोंगडे , डोक्यावर तिरकी किंवा आडवी बसवलेली  गांधी टोपी किंवा मुंडासे . बहुतेकांची तोंड बंद , तंबाकू चा बार ठासून भरलेला . 

एसटी ने पौड फा टा  सोडला की मोकळीक दिसू लागायची ..सगळी कडे शेत , अधून मघे एखाद्या शेतात झोपडी ,त्याबाहेर बांधलेल्या गाई ,म्हशी , शेळ्या ,कुत्री नजरेस पडायची ..त्यातील एखादे कानात वारं भरल्या सारखे एसटी ची पाठ धरायचे ..भुंकून भुंकून थोडे अंतर पाठलाग केल्या नंतर त्यातील फोलपणा लक्षात येऊन ते ओशाळे होऊन परत शेतात जायचे .

सकाळची थंड हवा एसटी च्या फुटक्या काचां मधून अंगावर येत असे .

खिळखिळीत झालेली एसटी ,खडखडाट करत मार्ग आक्रमायची . मध्येच स्टॉप आले की  ती थांबायची .प्रवासी चढले की एक गचका मारून पुढे चालू पडायची ..चांदणी चौक , भूगाव भुकूम  पिरंगुट घाट , पौड गाव ( येथे कायमच अजून सुद्धा पौडाचा म्हातारा , म्हाताऱ्याची बायको ,हे गाणे कायम आठवते) , मग सरळ सरळ रस्ता आणि मग एक चढ संपला की मुळशी ..

अंगावरची धूळ झटकत खाली उतरले की उरलेली थोडी वाहणाऱ्या वार्याबरोबर उडून जायची ..त्या थंडगार वार्याने अंगातून एक शिरशिरी जायची .सभोवताली पाणीच पाणी व खाली धरणाची भिंत ..त्यावेळी सीक्युरिटी वै भानगड नसल्याने आम्ही सरळ पाण्याकडे पळत सूटायचो . पाण्यात यथेच्छ खेळून पलीकडेच उभ्या असणाऱ्या लाँच कडे आम्ही जायचो .इतर काही प्रवासी तिथे थांबलेले असायचे . ठराविक आकडा झाला की लाँच सुटायची . दुगडुग आवाज करीत पाणी कापत आम्ही निघायचो .विस्तीर्ण जलाशय आणि आजूबाजूला डोंगर आणि दाट झाडी .लाँचच्या चाहुलीने पाण्यातून एकदम हवेत झेप घेणारे पाणबगळे आणि पटापट बाजूला पोहत पळणाऱ्या पाणकोंबड्या मन वेधून घ्यायच्या मध्येच एखादा मासा पाण्यातून उडी मारून परत पाण्यात अदृश्य व्हायचा त्याचा छानसा चुबुकक असा आवाज यायचा .,त्याच्या मुळे उठणारे तरंग लाँच च्या तरंगात मिसळून जायचे 

बगळे ,पाण कोंबड्या ,मासा व लाँच या सगळ्यांचे आवाज एक छान निसर्ग संगीत निर्माण करायचे ..मन आनंदून जायचे ..लाँच चा प्रवास जसे ज्या गाव चे प्रवासी असतील तसा व्हायचा .कधी हा किनारा तर कधी पलीकडचा . तासाभराने लाँच एक काठावर जाऊन थांबायची .तेथे उतरून एक छोटी टेकडी चढून वर गेल की टाटा समूहाच्या मालकीचे टाटा हायड्रो पॉवर चे केंद्र लागायचे . तेथेच माझ्या ओळखीचे बहुतेक सातपुते ( नांव अंधुकस आठवते ) रहायचे .त्यांचा मुलगा माझ्या भावाला  शाळेतून आणण्या पोहचवयायचे काम करत असायचा .

त्यांच्या घरी अगत्याने चहा ,पोहे असा खाऊ मिळायचा ..,त्या दुधाळ गोड मिष्ट चहाची चव अजून मनात ताजी आहे .

खाऊन झाले की ते आम्हाला आजूबाजूला हिंडवायचे . दाट जंगलझाडी मागे उंच डोंगर मोठा रम्य परिसर ..अधून मधून रात्री त्या भागात वाघ येतो असे त्यांनी सां गितले की छातीची धडधड उगीच वाढायची .

मग आम्ही टाटा हायड्रो पॉवर चे  केंद्र बघायला जायचो ..अनेक यंत्र ,बटणे असलेली एक मोठी खोली व तेथून पुढे गेल्यावर प्रचंड मोठे पाईप्स दृष्टीस पडायचे .हे पाईप्स उतारावरून खाली खोल कुठेतरी अदृश्य व्हायचे ..ते पार लोणावळा ,खोपोली पर्यंत जातात असे सातपुते आम्हाला सांगायचे..त्या पाईप वरून चालत गेलो तर लोणावळ्याला जाता येईल असा बालिश विचार मनात येऊन जायचा ..

थोडा वेळ तेथे काढून मग परत काठावर येऊन लाँच ची वाट बघत टिवल्या बावल्या करत वेळ काढायचा व लाँच आली की तीत बसून परत मुळशी कडे प्रवास .आता उन्हाचे चटके बसू लागले असायचे ,मग मध्येच पाण्यात हात घालून ते पाणी तोंडावर मारून घायचे एकमेकांवर उडवायचे असे चाळे चालायचे.

थोड्याच वेळात काठ  धरणाची भिंत दिसू लागयायची. लाँच काठावर लागायच्या आतच आम्ही पाण्यात उडया मारलेल्या असायच्या .त्या गुढगा भर पाण्यातून पाय उपसत बाहेर यायला मजा वाटायची .

परत चढ चढून वर रस्यावर आले की एका टपरीत चहा ,वडापाव ,मिसळ असले काहीतरी खाऊन एसटीची वाट बसायचो ., नसतेच बसायचो असेही नाही .शेजारच्या जाळीतली करवंद काढून आण , सातभाईच्या (सेव्हन सिस्टर्स) च्या थव्या मागे घाव , कुत्र्याच्या पिल्लाशी खेळ असे उद्योग चालू असायचे .

थोड्याच वेळात सूर्य मावळतीकडे झुकायला लागायचा , अंधार पडू लागायचा .आजू बाजूच्या झोपड्यातील दिवे लागायला सुरवात व्हायची .थंडी वाढू लागायची . सबंध जलाशय,ती मोठी भिंत काळोखात बुडून जायची ..

तशातच लांबून धूळ उडवत येणारी एसटी चे धूड बघितले की बरे वाटायचे ..हात दाखवून एसटी थांबल्यावर पटापट उड्या मारून आत शिरताना दार खाडकन लावूंन बसायचे . मग उलटा प्रवास सुरु व्हायचा .अंधारातून सुसाट वेगाने जाणाऱ्या एसटी तुन बाहेरील अंधार बघताना मजा वाटायची ..समोर नजर केली की काळोख चिरत दोन प्रखर दिवे रस्ता दाखवायचे   असेच बघता बघता डोळा लागायचा .दिवसभरच्या दगदगीने आंबलेले  शरीर  एसटीच्या वेगा बरोबर आणि बसणाऱ्या धक्कयांना तोंड देण्याकरता आपोआप ऍडजस्ट व्हायचे .ते त्याच तालात डोलू लागायचे ..मध्येच चला पौड आले असा       कंडकटर चा आवाज ,दार उघडल्याचा ,बंद केल्याचे आवाज अर्धवट झोपेत ऐकू यायचे ..

थोड्याच वेळात "अरे पोरांनो चला पुणे आले असे त्यांनी सांगितले की उतरायचे व एकमेकांचा निरोप घेऊन निघायचे ..आणखी एक मूळशीची ट्रिप संपन्न झालेली असायची .

आता मुळशी बदलली ,मुळशीच का सगळेच बदलले , गर्दी वाढली ,रस्ते मोठे झाले , छोटया झोपड्या जाऊन पार मुळशी पर्यंत मोठया इमारती ,कारखाने उठले . जागेला सोन्याचा भाव आला .अनेक मोठी हॉटेल्स ,क्लब्ज ,फार्म हाऊसेस त्या रस्यावर उभी राहिली .लोकांच्या हातात पैसा आला ,त्याबरोबरीने येणारी सुबतत्ता , गाडी ,सर्वकाही चांगले वाईट आले .

मूळशीतून पुढे कोकणात जाणार ताम्हणी घाट झाला ,तेथे पडणारा पाऊस व धबधबे बघणारा एक नवा वर्ग तयार झाला . महागाई वाढली .दहशत वाद वाढला ,त्यामुळे सीक्यूरीटी वाढली ,पुर्वीची मोकळीक संपली . अविश्वास वाढला .माणुसकी कमी झाली .

आमचा मित्र परिवार ही आपापल्या वाटेने पांगला .आता कधी भेट झाली कि त्या आठवणी निघतात .अरे चला जाऊया परत मूळशीला ,एस्टीनेच जाऊ ,अस म्हणल्या वर चेहऱ्यावरची उमटणारी काळजी बघून हसू येते ..आपण ही किती बदललो , आता स्वतःची एसी गाडी असल्या शिवाय प्रवास नकोसा वाटतो , रहायला बसायला ,खायला सगळे उच्च प्रतीचे ...का ,असे का ? परत एकदा तीच जादू अनुभवायला काय हरकत आहे ? माझी तयारी आहे ?  मित्रांनो तुमची ?

No comments:

Post a Comment