Tuesday 5 December 2017

Shashi kapoor, death, mahabaleshwar, dina,hotel ,room, favorite,photo, pan hyani ,actor

"बाय,अँड थँक्स फॉर माय रूम "..

शशी कपूर यांचे निधन झाल्याची बातमी समजली आणि हे वाक्य कानात घुमू लागले ...आणि माझ्या नजरेसमोर पंधरा  वर्षा पूर्वीचा तो प्रसंग उभा राहिला ...

त्यांचे अनेक चित्रपट बघितले होते ..अतिशय देखणा माणूस 

.. आम्ही महाबळेश्वर च्या दीना मध्ये उतरलो होतो . तारीख होती ०९ जानेवारी २००२. दोन दिवस मुक्काम करून झाला होता . ब्रेकफास्ट झाला होता ,आता खोलीत जाऊन ,आवरून बॅग्ज भरून निघायचे . तेव्हढ्यात दीना चा मॅनेजर आला व म्हणाला सर अजून किती वेळ लागेल आपल्याला आवरायला ? मी म्हणालो " अहो चेक आऊट १२ वाजता आहे . आत्ता १० तर वाजताहेत ..एव्हढी काय घाई आहे ? " ओशाळून तो म्हणाला नाही नाही घाई नाही , "साहेब" आले आहेत ,त्यांना रूम द्यायची होती म्हणून विचारायला आलो होतो ..मला जरा रागच आला "मी म्हणालो कोण हे "साहेब" ,ज्यांना एव्हढी घाई झाली आहे "? तो म्हणाला "शशी कपूर जी "

नावं ऐकून मी गडबडून गेलो .माझा सगळा राग क्षणात मावळला .मी म्हणालो "कुठे आहेत साहेब "?
तो म्हणाला इथेच पोर्च मध्ये थांबले आहेत . 

मी त्याच्या बरोबर पोर्च मध्ये गेलो तर समोर शशीजी एका खुर्चीत  बसले होते .समोर जुन्या जमान्यातील मारबाल टॉप चे गोल टेबल होते . त्यावर ठवलेल्या कपातून ते चहा पीत होते मी जाऊन त्यांना नमस्कार केला. 
" हेच ते साहेब जे "तुमच्या" रूम मध्ये उतरले आहेत  . मॅनेजर ने माझी ओळख करून दिली .शशी जीं हसून माझ्या कडे बघून म्हणाले , बैठीये आप , आपको अकारण तकलीफ दी इन लोगों ने .बहोत साल से मेरी एक बुरी आदत है ..जब भी मैं महाबळेश्वर आता हू यही हॉटेल मैं ठहेरता हूं और मेरी रूम भी वही होती है जीसमे आप रुके हुवे है " 
दुसरे कौन से भी रूम मैं मुझे निंद नही आती" असे म्हणून ते खास त्यांच्या स्टाईल मध्ये हसले .
माझी नजर त्यांच्या वरून हटतच नव्हती .साध्या   शुभ्र कुर्ता पायजम्या  मध्ये देखील खानदानी रुबाबदार पणा म्हणजे काय हे त्यांच्या कडे बघून कळत होते . तांबूस स्वछ गोरा रंग  दाट पांढरे  ,करडे केस , तरतरीत नाक आणि ते प्रसिद्ध lopsided हास्य .. 

मी त्यांना म्हणालो ,सर आप मुझे सिर्फ दस मिनिट डिजीए मैं रूम खाली करता हूं " तसे ते एकदम म्हणाले " नही  नही,  ऐसें मत करना..टेक युवर टाइम , मुझे कोई  जलदी नही है " गलती मेरी है "मैं ही जलदी आ पहूंचा " 

मी अवाकच झालो , एव्हढा मोठा अभिनेता , निर्माता पण एव्हढा साधा , आपली चुक अशी मान्य करणारा ? 

मी लगेच खोलीत जाऊन पटापट आवरून बाहेर आलो ..आता माझ्या बरोबर माझी बायको वर्षा ,छोटी स्वप्ना आणि माझी भाची केतकी होते .आम्ही सर्व जण जाऊन शशी साहेबांना भेटलो ..त्यांनीही अगदी आपले पणाने सर्वांची चौकशी केली .आम्ही त्यांच्या सोबत फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली ती त्यांनी लगेच हसत हसत मान्य केली ..तो अनमोल फोटो आजही मी जपून ठेवला आहे ....

थोड्या वेळाने आम्ही  जाण्यासाठी वळलो   आणि  मागून आवाज आला  "बाय अँड थँक्स फॉर माय रूम "

No comments:

Post a Comment