Tuesday 1 November 2016

Menvali ghat ,Wai ek nisargchitra

निसर्गचित्र 

काल वन डे वाई ट्रिप केली .

बरेच दिवस मेणवली मधील नाना फडनवीसांचा वाडा आणि घाट बघायचे मनात होते .

वाई पासून तीन  किमी वर हे वसलेले आहे .वाई च्या वेशीवर एक मोठे  लाकडी प्रवेशद्वार आहे ..दिंडी दरवाज्यासकट . ते ओलांडून पुढे गेले की थोड्याच वेळात एक फाटा येतो ..तेथे एक पाटी दिसते ..नाना फडणवीसांच्या वाड्याकडे . त्या छोट्या रस्त्याने आत गेलो की एक बखळ लागते ..तेथेच वाहनतळ आहे 

शेजारीच नानांचा वाडा दिसतो ..बरीच पडझड झालेली बाहेरून दिसते..आतून बघायची खूप इच्छा होती पण तो बंद होता ..पडवीत वाड्याची माहिती एका फलकावर लिहिलेली दिसली , दिसली ,पण वाचता आली नाहीत कारण ती पुसट झाली आहेत .

वाड्याच्या मागील बाजुस तो प्रसिद्ध  घाट आहे .संथपणे वाहणारी कृष्णा माई आणि आजूबाजूला दाट झाडी .पायऱ्या उतरून खाली आले की डाव्याबाजूला एक मोठा पार आहे .त्या पलीकडेच स्मशान ..उजवीकडे नजर टाकली की सुंदर दगडी पायऱ्या चा घाट ,त्या पलाकडे काठावर एक आणि दुसरे थोड्या उंचीवर अशी दोन सुंदर मंदिर . एक मेणेश्वरा चे म्हणजे शिवा चे आणि दुसरे वरचे श्री विष्णूचे .

 

खालच्या मंदीराच्या पुढे एक छोटेखानी घुमट असलेली वास्तू आहे .तीन चार पायऱ्या चढून गेल्यावर नजरेला पडते ती एक भली मोठी घंटा. ती जाड भक्कम साखळ्यानी  घुमटाला टांगलेली आहे .तिचे वजने एकदा टन तर सहज असेल .तिच्यावर मेरी आणि जीजस चे चित्र  व १७०७ अशी माहीती कोरलेली आहे.

ही घण्टा चिमाजी अप्पा  ? (का त्यांच्या भावाने  बाजीराव ) यांनी पोर्तुगीजाँन कडून जिंकून आणली असे सांगितले जाते . 

त्या काळी हिचे वाजणारे टोल अख्या वाईत ऐकू जात असणार .आता मात्र तो टोल ,जागेवर नाही ..,कोणी चोरला का फडनवीसांच्या वंशजांनी तो काढून ठेवला काही सांगता येत नाही .

मेणेश्वराचे मंदिर अतिशय सुंदर . समोर एक मोठा नंदी .आत अंधार असल्याने नीट दिसले नाही ,पण तेथे बसलेल्या एकाने आत एक पिंड आहे असे सांगितले .

मंदिराला लागूनच कृष्णा नदी वहाते .मंदिराच्या मागील बाजूने एक छानसे वळण घेऊन ती नजरेआड होते .पण ते वळण फारच सुंदर आहे ..बाजूला असणारी , पाण्यावर  ओंडवी झालेली झाडी , संथ  पाणी , आणि शांतता त्याला एक गूढ रूप देते ...निसर्गाचे उत्तम चित्रच ..

नानां च्या काळात तर काय रम्य ,सुंदर ,शांत आणि स्वच्छ परिसर असेल ना हा ?  तेव्हा हा वाडा रहाता असेल , त्यात जिवंतपणा असेल वाड्यातील माणस , गाई ,गुरं , पक्षी प्राणी ह्यांनी हा घाट जगता रहात असेल ..वाड्याचे मागचे दार घाटावरच उघडते .वाईच्या मुक्कामी असताना नाना एखाद्या सायंकाळी ,निवांत क्षणी येथे येऊन बसत असतील ,कोजागिरी पौर्णिमेला इथे विविध खेळ रंगले असतील , वाड्यातील सगळी कार्ये , व्रत वैकल्ये , आनंदी ,मंगल अमंगल सर्वच घटना ह्या घाटाने बघितल्या असतील .

आतासुद्धा वेगळ्या ऋतूं मध्ये या घाटाची शोभा बदलत असेल ..उन्हाळ्यात पाणी आटले की आतापेक्षा दहा पंधरा पायऱ्या उघड्या पडत असतील ,रखरखाट नकोसा होत असेल पाण्यावर येणारी माणस आणि गुर लगेच झाडाचा आसरा शोघत असतील ..काही लोक गाभाऱ्यातील थंडावा घेत तिथेच लवंडत असतील ...

पावसाळ्यात तर हे रूप पूर्णपणे बदलत असेल ..कृष्णा दुथडी भरून वहात असेल , पाणी आखून दिलेली सीमारेषा तोडून सर्व पायऱ्या गिळंकृत करून मंदिरा पर्यंत येऊन टेकत असेल ...सगळीकडे घसरडे झाले असेल , सर्वत्र हिरवं रान दाटले असेल , एखादा गावकरी गळ टाकून बसला असेल ..

तर थंडीत कळोख लवकर पडत असेल .पक्षी  आपल्या घरटी लवकर परतत असतील ..पाण्यावर काळा रंग जास्तच गूढता वाढवत असेल , लोक काठावर शेकोट्या पेटवून , बार भरून गप्पा हाणत असतील ,त्यात गावातील भानगडी , भूत खेत ह्याचा तडका असेल .

पहाटे पहाटे नदीवर दाट धुक्याचा थर जमा होत असेल , धुकं आणि पाणी नककी कुठंल हे सांगता येण अवघड होत असेल ... 

ह्या घाटाने अनेक स्थित्यंतरे बघितली असणार.. पूर्वीचा ऐतिहासिक काळ ते सध्या येथे होणारे अनेक सिनेमांच चित्रीकरण ..सर्वांना तो साक्षी आहे ...

जवळजवळ तीनशे वर्षांहून अधिक काळ उलटून गेला तरी वाडा, बाहेरून जरी पड्का झालेला असला तरी घाट उत्तम स्थितीत आहे जर नीट काळजी घेतली गेली तर अजून काही शतके त्याला काही डग नाही हे जाणवते व ही जाणीव खरी ठरो हीच त्या मेणेंश्वरा जवळ प्रार्थना...

सुनील गाडगीळ 

०१.११.२०१६

No comments:

Post a Comment